रत्नागिरी , पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्‍त वारे वाहत असल्यामुळे पावसासाठी काही प्रमाणात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता मोेसमी पावसासाठी अनुकूलता वाढत चालली आहे. पुढील आठवडाभर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे नैसर्गिक धूमशान सुरू होणार आहे.

किनारी भागात वादळी वार्‍यासह सागरी भागात उधाणाचा धोका असून, काही ठिकाणी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे किनारी भागात प्रशासनाने खबरदारी आणि सज्जतेच्या दिशेने आपली यंत्रणा सक्रिय केली
आहे. मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने मुंबईसह कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणखी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे. प्रामुख्याने दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोकण विभागात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भगात उधाणाच्या लाटा उसळू लागल्या होत्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील पाच दिवस सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पाच दिवसांचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागासह आपत्तीनिवरण यंत्रणेला सतर्क राहण्याचे सूचित केले असून संबंधित यंत्रणेला सक्रिय राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

मच्छीमार, नागरिकांना सावधगिरीचा इशारा
कुलाबा वेधशाळेने पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 25 जून पर्यंत कोकण किनारपट्टीसह गोव्यात ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच 20 जून ते 25 जून 2022 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षितता बाळगावी. संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here