खेड पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी शिवसेना पक्षात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पहिल्या दिवशी शिवसेनेसोबत असलेले खेड- दापोली- मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे बुधवारी गुवाहाटीकडे गेल्याचे चर्चेने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पदाधिकारी माध्यमातून सावध प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या निर्णयाचे समर्थन होताना दिसत आहे. शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या झेंड्याचा थेट परिणाम झाला आहे. रायगडमधील सर्वच शिवसेना आमदार ना. शिंदे यांच्यासोबत गेल्याने रायगडची शिवसेनेची तटबंदी ढासळली आहे. खेड- दापोली- मंडणगड मतदारसंघ हा रायगडला लागून असल्याने व रायगड लोकसभा मतदारसंघात असल्याने या मतदारसंघात हे लोण पसरणार की काय, याबाबत मंगळवारी रात्रीपर्यंत शिवसैनिकांमध्ये साशंकता होती.

येथील आमदार योगेश कदम हे मंगळवारी मातोश्री व वर्षा बंगल्यावर असल्याने बंडाचे लोण रायगडच्या सीमेवर थोपवण्यात यश येणार, अशी चर्चा होती. परंतु, बुधवारी सकाळीच आ. योगेश कदम हे संजय राठोड यांच्यासह गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यावर येथील शिवसैनिकांनी याची माहिती घेण्यास सुरुवात केली. आ. कदम यांच्याशी थेट संपर्क होत नसल्याने खेड, दापोली व मंडणगड येथील शिवसैनिक संभ्रमात पडले. आगामी काही दिवसात राज्यातील राजकीय समिकरणाकडे मात्र या मतदारसंघातील सर्वच पक्षांचे व शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

खेड -दापोली-मंडणगडचे आमदार शिंदे गटात गेल्याची चर्चा

आपण आ. योगेश कदम यांच्यासोबत : धाडवे

शिवसेना पक्षाचा तालुका सचिव म्हणून मी पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्यासोबत आहे. अद्याप आ. कदम यांनी पक्ष सोडलेला नाही. शिवसेना नेते रामदास कदम व आ. योगेश कदम हेच येथील शिवसैनिकांचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, ते कोणताही महत्वाचा निर्णय घेताना आम्हाला अंधारात ठेवून नक्कीच घेणार नाहीत. आजही शिवसेना संघटनेसाठी जे योग्य आहे तेच ते करत आहेत, असे मत शिवसेना खेड तालुका सचिव सचिन धाडवे यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here