
रत्नागिरी , पुढारी वृत्तसेवा : शहरानजीकच्या मिरजोळे येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तब्बल 72 हजारांची 48 लिटर गावठी दारू, इतर साहित्य आणि 3 दुचाकी असा एकूण 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई बुधवार 22 जून रोजी सकाळी 7.30 वा. करण्यात आली असून तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पाटील, सुनील पाटील, संतोष सकपाळ (सर्व रा. मिरजोळे पाटिलवाडी, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राहुल पावसकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक ह्रिषीकेश रेड्डी,सहायक पोलिस निरीक्षक शेळके. पोलीस नाईक पावसकर, कदम, गायकवाड, पोलिस हवालदार वाझे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, कांबळे यांनी केली.