
रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व्हावे ही कोकणवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी मी सुद्धा पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी धूळखात पडलेल्या या मागणीचे गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समजले आणि त्यांच्याच हस्ते शुभारंभ झाला. ही नियतीचीच इच्छा होती, असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे.
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून झाले. रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावरून विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गावरून पहिली ट्रेन धावली. याचे कोकणवासीयांची जल्लोषात स्वागत केले.
यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची आमची अनेक वर्षांची मागणी होती. यासाठी मीसुद्धा खासदारकीच्या पाच वर्षांच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी आमची मागणी धूळखात पडली होती. परंतु, या विद्युतीकरणाचे महत्त्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणले. याबद्दल पंतप्रधानांचे आम्ही कोकणवासीय आभारी आहोत.
या विद्युतीकरणाचा नेमका फायदा येत्या काळात समजणार आहे. या एका ऐतिहासिक बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. निसर्गरम्य कोकणातील प्रदूषण कमी होणार असून, इंधन खर्चावर मोठी बचत होणार आहे. या सगळ्या बदलामुळे कोकण रेल्वेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होणार आहे. असे हे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच व्हावे हीच कदाचित नियतीची इच्छा होती. म्हणूनच इतक्या वर्षांनंतर हे महत्त्वाचे काम पूर्णत्वाला गेले आहे, असे नीलेश राणे म्हणाले.