
सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झालेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आ. दीपक केसरकर यांच्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वेंगुर्ले, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील शिवसैनिकांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आ. केसरकर यांचे सावंतवाडीतील श्रीधर आपार्टमेंट कार्यालय गुरुवारी सुने-सुने होते, तर याउलट शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची वर्दळ दिसून येत होती.
आ. केसरकर हे दोन वेळा भाजपाविरोधात लढले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीवेळी गोवा राज्यातील सर्व मंत्री त्यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील जाहीर सभा रद्द करून सावंतवाडीत सभा घेतली आणि आ. केसरकर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधली. सध्याच्या राजकीय स्थित्यंतरात आ. केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास त्यांच्यासोबत कोणीही शिवसैनिक जाणार नाही ,असा संदेश निष्ठावंत सैनिकांनी दिली असून सध्यस्थितीत शिवसेना पदाधिकार्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेने भाजपासोबत जावे ही आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे बुधवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी मंत्री शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दिले. त्यानंतर सर्व शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. या हॉटेलमधून आमदार केसरकर बाहेर पडत असताना युवा सैनिकांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास रोखले.
विधिमंडळ पक्षाचे शिवसेनेचे गटनेते अरविंद चौधरी यांनी त्यांना जाऊ दिल्यानंतर युवा सैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर युवा सैनिकांनी पहारा ठेवला. त्यामुळे आ.केसरकर संतापले व त्यांनी युवा सैनिकांची दादागिरी खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. मंत्री शिंदे सोबत जाण्यापासून आपणास कोणीही अडवू शकणार नाही असे वृत्तवाहिनीला सांगून ते गुरुवारी सकाळी गुवाहाटीला पोहचले.
आ.केसरकर यांच्या शिंदेसोबत जाण्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या बंडामध्ये सहभागी झाल्यामुळे दीपक केसरकर यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघात असंतोष निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
भविष्यात शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन सत्ता स्थापन केली तर यामध्ये आपणास मंत्रिपद मिळेल या लालसेपोटी केसरकर यांनी गुवाहाटी गाठली असल्याची टीका आता शिवसेनेतून उघडपणे होऊ लागली आहे. ज्या शिवसेनेने केसरकर यांना दोन वेळा निवडून आणले त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती केसरकर कृतघ्न झाले, अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.