चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी कोयनेतील शिवसागर जलाशयात अवघे 14.45 टीएमसी पाणी आहे. कोयना धरणाच्या एकूण जलसाठ्यापैकी फक्त 13.72 टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. पावसाने यावर्षी उसंत घेतली असल्याने धरणालादेखील कोरड पडली आहे.

यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. मात्र, वेधशाळेचे अनुमान फोल ठरले आहे. जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे अजूनही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत.

कोयना धरण क्षेत्रात देखील अद्याप पावसाला जोर आलेला नाही. याचा परिणाम कोयना जलशयातील पाणीसाठ्यावर झाला आहे. कोयनेची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी आहे. मात्र, सद्यस्थितीत धरणात अवघे 14.45 टीएमसी पाणी असून धरणाची पाणी पातळी 2040 इंच आहे. सद्यस्थितीत कोयनेतून कोयना नदीमध्ये 2100 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी घटत असताना दुसर्‍या बाजूला पावसाने उसंत घेतल्याने जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

वीजनिर्मितीवर परिणाम नाही

जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाळा सुरू झाल्याने राज्याची विजेची मागणी घटली. यामुळे अत्यल्प प्रमाणात कोयना वीज प्रकल्पाच्या चार टप्प्यातून वीजनिर्मिती सुरू आहे. विजेची मागणी घटल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली असली, तरी त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम झालेला नाही. धरणामध्ये 10 टीएमसी पाणी असेपर्यंत वीजनिर्मितीला कोणताही अडथळा येणार नाही. मान्सून सक्रिय झाल्यानंतर वीजनिर्मितीला कोणतीही अडचण येणार नाही, असे कोयना जलविद्युत केंद्राच्या व्यवस्थापनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here