
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेतील 37 हून अनेक आमदार यात सहभागी झाले असले तरी रत्नागिरीचे आमदार व उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. या घटनेनंतर प्रथमच ते रत्नागिरीत परतत आहेत. मात्र, या दौर्यात एकही कार्यक्रम नसून ते पाली येथील निवासस्थानी थांबणार आहेत. या ठिकाणी ते शिवसेना पदाधिकार्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील तीन दिवस रत्नागिरीचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. त्यांच्यासोबत राजापूरचे आमदार राजन साळवीही होते. या दोन्ही आमदारांनी आपण मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. ना. सामंत तर सेनेच्या विविध बैठकांनाही उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती आपण पार पाडणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
या घडामोडीच्या चौथ्या दिवशी ना. सामंत रत्नागिरीच्या दौर्यावर येत आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसने ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून थेट पाली येथील निवासस्थानी जाणार आहेत. त्या ठिकाणी ते कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी चर्चा करणार का? कार्यकर्त्यांना भेटी देणार का? याची चर्चा दौर्याच्या कार्यक्रम आल्यानंतर सुरु झाली आहे.