रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत निघाली आहे. ही वाढ कासवगतीने होत असली तरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा कोरोना रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 6.1 असून हा आणखीन वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण 52 बाधितांपैकी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बारा जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती अतिगंभीर नसली तरीही सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हावासीयांनी पावले उचलली पाहिजेत, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

राज्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.1 असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या चारही जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी अधिक आहे. बाधित सापडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे मुंबईशी निगडीत असल्यामुळे या ठिकाणी बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. 23 जूनपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 52 एकूण बाधित आहेत.

त्यातील गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या 40 इतकी असून संस्थात्मक विलगीकरणात 12 जण आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील बरेचसे बाधित हे गंभीर आजारांनी ग्रासलेले आहेत. गृहविलगीकरणातील बर्‍याचशा बाधितांना लक्षणे नाहीत. ही बाब सकारात्मक असल्याचे आरोग्य यंत्रणचे मत आहे. मुंबईतील बाधितांची संख्या कमी होऊ लागली की पुढे पंधरा ते वीस दिवसांनी कोकणातील बाधितांचा आकडा कमी येत जातो.

सध्या मुंबईतील बाधितांचा आकडा दररोज हजाराच्या पुढे आहे. कोरोनाच्या मागील तीन लाटा या जून, जुलै महिन्यातच उद्भवलेल्या होत्या. मे महिन्यात बाधित वाढत गेले आणि पुढे सप्टेंबरनंतर त्यात घट होती गेली. तशीची परिस्थिती सध्या दिसत असून बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here