
सावंतवाडी : शहरातील भर वस्तीतील उभाबाजार परिसरात राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार महेश शेणई यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्यानी फोडून चांदीचा ऐवज व परकीय चलनातील नाणी मिळून एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गेल्या दोन आठवड्यात घरफोडीची ही चौथी घटना असून, चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेलाच आव्हान दिले आहे. दरम्यान, या चोरीत सुदैवाने सोन्याचा किमती ऐवज चोरीस गेला नाही. ही चोरी एकाचवेळी गेल्या आठवड्यात झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबबत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी भेट देत पाहणी केली.
उभाबाजार येथील बंगल्याचे मालक शेणई हे एक महिन्यापूर्वी कुटुंबासमवेत पुणे येथे मुलाकडे राहायला गेले होते. त्यामुळे त्यांचा बंगला बंदच होता. हाच डाव साधून चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला. बंगल्या समोरील लोखंडी गेटला कुलूप होते. मात्र, त्याला हात न लावता त्यावरून उडी मारत आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत कपाट व लॉकर मधील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. तर आतील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. प्रथम दर्शनी चांदीच्या वस्तू चोरीस गेल्याचे दिसून येत आहे. मात्र, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाही. बंगल्याचा दरवाजा तोडलेल्या स्थितीत असल्याचे गुरुवारी सकाळी तेथून जाणार्या एका शाळकरी मुलीच्या निदर्शनास आले असता तिने याबाबतची कल्पना आईला दिली.त्यानुसार त्यांनी घटनेची माहिती श्री. शेणई यांना दिली.
त्यानंतर ते तत्काळ सावंतवाडीत दाखल होत पाहणी केली असता चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. यावेळी कपाटातील चांदीच्या वस्तू त्यांना आढळून आल्या नाहीत. तर चोरट्यानी चांदीचा मुकुट, करंडा, सिंगापूर येथील परकीय चलनातील तीनशे डॉलरची नाणी व चांदीचा ऐवज मिळून एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह सहा.पो.निरीक्षक तौफिक सय्यद, पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली आदी घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाजवळ ठेवलेली दुचाकी व आतील एलईडी टीव्ही अशा अन्य वस्तूला हात न लावता चोरट्याने कपाट, लॉकर फोडून आतील चांदीच्या वस्तू लंपास केल्या आहेत. चोरीचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याचा संशय आहे. दिवसेंदिवस शहरात घरफोड्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, चोरीचे सत्र चालूच असताना चोरट्यांपर्यंत पोहोण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.