कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सावंतवाडीचे आ. दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेतली असली तर अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांना मागे या असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत आ. केसरकर आपली भुमिका स्पष्ट करत नाही व शिवसेना नेतृत्वाकडून पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील शिवसेना कोणतीही भूमिका घेणार नाही. आ. केसरकर यांची जशी अ‍ॅक्शन असेल तशी शिवसेनेकडून रिअ‍ॅक्शन असणार आहे. त्याचबरोबर सावंतवाडीत सोमवारी शिवसैनिक एकवटणार आहेत. मात्र ते शक्‍तीप्रदर्शन नसल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

शिवसेना सिंध्ाुदुर्ग कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेल्या आ. दीपक केसरकर यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. सावंतवाडी मतदार संघावर स्व. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेहमीच प्रेम राहिले आहे. या मतदार संघातील शिवसैनिक नेहमीच पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. आ. केसरकर यांनी आपली पुढील भुमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही त्याचबरोबर शिवसेना नेतृत्वानेही आ. केसरकर यांच्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेल्या आमदारांनी पुन्हा शिवसेनेत येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटावे असे यापुर्वीच जाहिर केले आहे. त्यामुळे आ. केसरकर यांची पुढील भूमिका स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना आपली भूमिका घेणार आहे असे दुधवडकर यांनी सांगितले.

आ. केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उटल्याचे दिसून येत नाही अशी विचारणा केली असता शिवसेना मवाळ झालेली नाही. लवकरच शिवसेनेची आक्रमकता दिसून येईल. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिक सोमवारी सावंतवाडीत एकवटणार आहे. मात्र हे शक्‍तीप्रदर्शन नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शिवसैनिक ठामपणे असल्याचे दाखविण्यात येणार आहे. यावेळी रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

एकीकडे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे कुडाळ मालवणचे आ. वैभव नाईक यांचा सावंतवाडी विभागातील शिवसेना पदाधिकार्‍यांकडून जिल्हा कार्यकारिणी बैठकीनंतर सत्कार करण्यात आला. उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, गणेशप्रसाद गवस, शब्बीर मनियार, यशवंत परब,चंद्रकांत कासार, बाळा दळवी, सचिन देसाई, अपर्णा कोठावळे, योगेश नाईक, पंकज शिरसाट, मदन राणे, विद्याधर परब, अजीत राऊळ, विनायक सावंत, संजय गवस, भगवान गवस आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here