
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत कुष्ठरुग्णांची संख्या घटू लागली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी शेकडोंनी रुग्ण होते. आता मात्र अत्यल्प रुग्ण आढळत आहेत. गतवर्षी 46 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी 2 महिन्यांत 8 रुग्ण आढळून आले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 99 टक्के असून यामध्ये विकृतीचे प्रमाण 1 टक्का आहे.
आपल्याला संसर्गिक रुग्णांचे प्रमाण कमी करायचे आहे. आता जनजागृती आणि असंसर्गजन्य आजार असतानाच वेळेत उपचार घेतल्याने कुष्ठरुग्ण संख्या घटतेय, अशी माहिती कुष्ठरोग नियंत्रण विभागाचे प्रभारी सहायक संचालक डॉ. वसीम सय्यद यांनी दिली.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी कुष्ठरोगाबाबत गैरसमज होते, त्यामुळे हे रुग्ण उपचाराला वेळेत सुद्धा येत नव्हते. मात्र, हा आजार औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो, हे लक्षात आल्यानंतर वेळेत उपचार घेणार्यांची संख्या वाढू लागली आहे. गतवर्षी 46 रुग्ण आढळले. यामध्ये संसर्गिक 37 रुग्ण आढळल. हे संसर्गिक रुग्ण कमी करण्याचे मोठे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. तसेच 9 असंसर्गिक रुग्ण, तर एक विकृत रुग्ण आढळला. यामध्ये 45 रुग्ण पूर्णपणे बरे झाले तर एका विकृत रुग्णावर उपचार सुरूआहेत.
एप्रिल आणि मे 2022 मध्ये 8 रुग्ण आढळले यामध्ये 5 संसर्गिक तर 3 असंसर्गिक रुग्ण आढळले असून हे 8 रुग्ण बरे आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांना आरोग्य उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 12 महिन्यांचे औषध उपचार कीट पुरविले जाते. या आजारावर 12 महिने औषधे नियमितपणे घेतल्यास हा आजार 99.99 टक्के बरा होतो, असेही डॉ. वसीम सय्यद यांनी सांगितले. कुष्ठरोग झाल्यानंतर रुग्णाला पहिला डोस दिल्यानंतर 99 टक्के जंतू मरून जातात. तरीदेखील 12 महिने औषधे घ्यावी लागतात.
मुळात हा आजार हवेतून पसरतो. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या आजाराची लागण होत नाही. या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अंगावर बधिर चट्टा दिसून येतो. हा बधिर चट्टा दिसताच वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.