चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : ही वेळ जोडण्याची आहे तोडण्याची वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरण्याची ही वेळ आली आहे. आव्हान देण्यापेक्षा प्रेमाने बोला, प्रेमाने जिंका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार यातून नक्‍कीच पुढे जाईल, अशा शब्दांत भावना व्यक्‍त करून शिवसेना प्रवक्‍ते व खासदार संजय राऊत यांना आ. भास्कर जाधव यांनी प्रेमाचा सल्ला दिला आहे.

‘आ. भास्कर जाधव नॉट रिचेबल’ अशा वृत्ताने शुक्रवारी सकाळी खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी आ. जाधव हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आत्तापर्यंत आपण दोनवेळा पक्षांतर केले. एकदा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर दुसर्‍यावेळी राष्ट्रवादी सोडली. मात्र, शिवसेना सोडताना आपण विधीमंडळ कार्यालय, पक्ष कार्यालय या ठिकाणी जाऊन सर्व प्रक्रिया पार पाडली. पक्षाची सभासद फी भरली आणि त्याची पावती घेतल्यानंतरच पक्ष सोडला. राष्ट्रवादी देखील आपण सोडली. पण असे करताना आपण कोणाचाही विश्‍वासघात केलेला नाही. पक्ष सोडताना आपण पक्षश्रेष्ठींना रीतसर पत्र दिले. त्यांना त्या बाबत पूर्ण माहिती दिली. कोणतीही जबाबदारी, पक्षाचे पद किंवा अधिकाराचे पद बरोबर ठेवून आपण पक्ष सोडला नाही हे वास्तव आहे.

काँग्रेसच्या निधी वाटपाच्या आरोपावर आ. भास्कर जाधव म्हणाले, ही तक्रार काहीअंशी सेनेच्या आमदारांची पण होती. मात्र, आपण सत्ताधारी आमदार आहोत. त्यामुळे कुठच्या आमदाराला किती निधी मिळाला, कुठच्या मतदारसंघात कमी-जास्त निधी मिळाला याची माहिती आमदारांना देणे गरजेचे होते. अर्थ खाते हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे खाते आहे.

ना. अजित पवार यांनी त्यांच्या शैलीमुळे काही कमी-जास्त झाले असेल. मात्र, अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार ज्या-ज्या खात्याला जो निधी दिला जातो त्या खात्याच्या मंत्र्यांनी निधीचे समान पद्धतीने वितरण केले की नाही हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे याला कोणी एक मंत्री जबाबदार असू शकत नाही. गत पाच वर्षाच्या सरकारमध्ये जेवढा आमदारांना निधी मिळाला नाही त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षात जास्त निधी मिळाला आहे हे आपण पटवून देऊ.

पक्षाने आपल्यावर कोणतीही जबाबदरी दिलेली नाही. विधान परिषदेचे मतदान झाल्यावर आपण 20 रोजी चिपळूणमध्ये दाखल झालो. त्यानंतर चिपळूणमध्ये संघटनेच्या बैठका घेतल्या आणि पक्षाने बोलविल्याबरोबर मुंबईत दाखल झालो. आता मिरज येथे भावावर शस्त्रक्रिया झाल्याने तातडीने मुंबईतून आलो. ज्यावेळी पक्ष बोलवेल त्यावेळी आपण तातडीने जावू. आपल्यावर कोणतीही जबाबदारी नसल्याने आपण मतदारसंघात काम करीत आहोत, असेही आ. भास्कर जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here