girl Kidnapping attempt

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला लागूनच असलेल्या एका गांवात शुक्रवारी सकाळी 9.30 वा. शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. त्या मुलीला ओमनी कारमधून अज्ञाताने अपहरण करण्याच्या उद्देशाने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने इसमाच्या हाताचा चावा घेत तेथून पलायन केले. याबाबत पोलिस ठाण्यात माहिती मिळताच सर्वत्र नाकाबंदी करीत संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

सदर मुलगी शाळेत जाण्यासाठी नेहमी प्रमाणे सकाळी 9.30 वा. बस स्टॉपवर आली. सदर बस स्टॉप असलेला तिठा नेहमी गजबजलेला असतो. या तिठ्यावर ओमनी गाडी उभी करून अज्ञात इसमाने तिला कार मध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने त्याच्या हाताचा चावा घेत तेथून पलायन केले व घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

त्या नंतर पालकांनी मुलीसोबत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही तातडीने नाकाबंदी करीत घटनास्थळी भेट दिली.  त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात त्यांना संशयास्पद वाहन आढळून आले. त्या वाहनाचा पोलिसांनी शोध घेत चौकशी केली असता तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे निदर्शनास आले.

सदर विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबानुसार ओमनी गाडीचा मागील दरवाजा उघडून आतील व्यक्‍तीने गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान बाळगत आपण त्या व्यक्‍तीच्या हाताचा चावा घेत पळ काढला. दरम्यान सदर व्यक्‍ती गाडीसह फरार झाल्याची माहिती तिने सावंतवाडी पोलिसात दिली.

मुलीने दिलेल्या माहितीनुसार या वर्णनाच्या काही गाड्यांचा तपास करण्यात आला. मात्र त्यात काहीही निष्पन्‍न झाले नाही अशी माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. तरीही पोलिस प्रशासनाने शहरातील चिटणीस नाका तसेच महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करीत उशिरापर्यंत तपास सुरूच ठेवला.

The post सावंतवाडीलगत शाळकरी विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न! appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here