सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने गेली तीन दिवस सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले. पावसामुळे आंबोली घाटात शुक्रवारी दुपारी 12 वा. सुमारास मोठे झाड पडून तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली. मुख्य धबधब्यापासून दहा कि.मी. अंतरावर हे झाड अगदी वळणावर पडले होते. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, नागरिक यांच्या मदतीने हे झाड हटविण्यात आले. मात्र, तत्पूर्वी घाटातून दोन्ही बाजूने होणारी वाहतूक बराच काळ खोळंबली होती.

आंबोली घाटातील धोकादायक झाडे तोडावी, अशी वारंवार मागणी करून देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तशी स्थिती यंत्रणा दिसून आली नाही. घाटात पहिल्याच पावसात वाहतूक खोळंबली त्यामुळे अनेकांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.

सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. वेळेवर दाखल झालेल्या पावसाने मध्येच दांडी मारली त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र, त्यानंतर पावसाने आपली उणीव भरून काढली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. न थांबता रात्रंदिवस पाऊस कोसळत असल्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान प्रभावीत झाले आहे. या पावसाने तालुक्यात अन्यत्र कुठेही पडझड अथवा हानी झाली नाही.

मात्र, आंबोली घाटात शुक्रवारी दुपारी भर रस्त्यात झाड आडवे पडून वाहतूक ठप्प झाली. याबाबत माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली. याची कल्पना सार्वांजनिक बांधकाम विभागाला दिल्यावर उपकार्यकारी अभियंता आवटी यांनी तातडीने धाव घेत यंत्रणा राबवून प्रवासी तसेच कर्मचार्‍यांच्या मदतीने झाड तोडून बाजूला केले. पोलिस प्रशासनाने घाटातील वाहतूक व्यवस्था थांबवून ठेवली. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here