कणकवली , पुढारी वृत्‍तसेवा :  राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी आणि त्यासाठी जर पोलिस कमी पडले तर माझी सुरक्षा काढून त्यांना देण्यात यावी असे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आजच आपण दिले आहे. खरेतर दीपक केसरकर ज्या ज्या वेळी पक्षांतर करतात त्या त्या वेळी त्यांची सुरक्षा धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे असते. परंतु सिंधुदुर्ग जिल्हयातील जनता शांत आहे. बंडाच्या पार्श्‍वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात कोणतीही घोषणाबाजी शिवसैैनिकांनी केलेली नाही. परंतु ज्या ज्या वेळी ते पक्षांतर करतात त्याचवेळी त्यांना सुरक्षा वाढवून देण्याची मागणी का करावी लागते? दहशतवादाचा मुद्दा का पुढे येतो? असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी लगावला.

आ. दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्त्व्याच्या पार्श्‍वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आ. नाईक म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. दीपक केसरकर यांना पाच वर्षे गृहराज्यमंत्रीपद देवून संपूर्ण राज्याच्याच सुरक्षेची जबाबदारी दिली होती. याचे भान केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलताना ठेवावे. उद्धव ठाकरे यांनी कोणाचीही सुरक्षा काढलेली नाही. राणेंचा दहशतवाद कुणी मोडून काढला ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ज्ञात आहे. हातात झेंडे घ्यायलाही कार्यकर्ते नसताना राणेंच्या विरोधात कोणी निवडणूक लढवली हेही जनतेला माहीत आहे.

आ.केसरकर सांगताहेत की राणेंचा दहशतवाद आपण मोडला पण खरा दहशतवाद कोणी मोडला हे शिवसैनिक व जनतेला माहिती आहे. 2009 मध्ये माझा जीव धोक्यात घालून मी राणेंच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी मला 50 हजार मते मिळाली. दोन वेळा माझा जीव वाचला होता. राणेंच्या गाड्या पाठलागावर होत्या. मात्र याचा आम्ही कधी बाऊ केला नाही. मी माझं हे मोठेपण यापूर्वीही सांगितलं नाही व यापुढेही सांगणार नाही.

आ.केसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही किंवा त्यांनी कधी उद्धव ठाकरेंच्या त्रुटी काढल्या नाहीत, मात्र आता सरकार बदलते म्हटल्यानंतर ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले आहेत. आ.दीपक केसरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलताना त्यांनी विचार करावा. आपल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरावे. जिल्हयातील जनतेला हे माहीत व्हावे म्हणूनच स्पष्टीकरण करत असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here