
दापोली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात दापोलीचे आमदार योगेश कदम हे सामील झाल्यानंतर त्यांना दापोलीतून समर्थन दिले जात आहे. या समर्थनाचे पडसाद आता थेट मातोश्रीवर उमटले असून, योगेश कदम यांना समर्थन देणार्या दापोली तालुक्यातील समर्थक पदाधिकार्यांची शिवसेनेची पदे हटवली जातील अशी चर्चा आहे.
आमदार योगेश कदम यांचे दापोलीतील कोकंबाआळी येथील कार्यालयात दोन दिवसांपूर्वी दापोली शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, सुधीर कालेकर दापोली तालुका संघटक उन्मेष अबगुल, दापोली महिला आघाडी दीप्ती निखार्गे, महिला उपजिल्हा संघटक रोहिणी दळवी यांनी दापोलीतून योगेश कदम यांना जाहीर पाठिंबा अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे या पदाधिकार्यांना पदावरून हटविले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.राज्यातील सर्व आमदारांनी मतोश्रीची साथ सोडली तरी आमदार योगेश कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत, अशी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर सुरू होती. मात्र, कदम हे बंडात सामील झाल्यावर त्यांना पाठिंबा असल्याचे समर्थकांनी जाहीर केले. मात्र, अजूनही शिवसेनेतील काही योगेश कदम समर्थक आपली भूमिका जाहीर करताना दिसत नाहीत. त्यामुळे दापोलीत अजूनही काही शिवसैनिक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत.
दापोलीत आ. योगेश कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या वादविवादाचे पडसाद अनेकवेळा दापोलीच्या राजकारणात उमटले आहेत तर दापोलीचे नेतृत्व कोण करणार, असा पेच अनेकदा दापोलीत निर्माण झाला आहे. मात्र, तरी देखील दापोलीतील शिवसैनिकांनी आमदार योगेश कदम यांची बाजू अनेकदा उचलून धरली तर मातोश्रीने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री रामदास कदम यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्याबाबत मातोश्रीची नाराजी उघड दिसली. त्या नंतर दापोली नगर पंचयात निवडणूक ते तालुक्यातील संघटन अशी जबाबदारी ही माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली.
या सर्व राजकीय घडामोडीत आमदार योगेश कदम ये शिवसेना सोडून भाजपमध्ये जातील, अशी चर्चाही अनेक दिवस राजकीय वर्तुळात होती. त्यात एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड याचा फायदा आमदार योगेश कदम यांनी उचलत एकनाथ शिंदे गटाला समर्थन देऊन शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हादरा दिला आहे.