
खेड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात शहर व ग्रामिण भागात गेल्या चोवीस तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, दि.1 जूनपासून एकूण 159 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली असली तरी, अद्याप जलस्तर इशारा पातळीच्या खालीच आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतात नांगरणी सुरू झाली असून, शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे. भारतीय हवामान खात्याने दि.25 व ता.26 रोजी रायगड -रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार दि. 24 रोजी मध्यरात्रीनंतर पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या. मागील चोविस तास पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे शहरीभागात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकर्यांनी लावणी योग्य तयार झालेली रोपे काढून काही ठिकाणी लावणी करण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील नातूवाडी धरणक्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण 259 मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या तुलनेत खेड तालुक्यात पावसाची नोंद कमी असली तरी अगामी 24 तासात ही कसर भरुन निघण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या जगबुडी व नारंगी नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. जगबुडी नदीत चार मीटर एवढी पाणीपातळी असून, तुर्तास पूर इशारा पातळीच्या खाली पाणी असल्याने नागरिक निश्चित आहेत. पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. मुंबई – गोवा महामार्गाप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे मासेखवय्यांनी शेताचे बांध, नदीकिनारी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून येत आहे.