
खेड : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र्य गट स्थापन करून खळबळ उडविली आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे शिंदे यांच्या समर्थक गटामध्ये सामिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कदम यांच्या समर्थनाथ शिवसैनिक प्रतिक्रिया देत असले तरी रविवार, दि. 26 रोजी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी खेड शहर परिसरात ठाकरेंच्या समर्थनाथ शहरात ठिकठीकाणी फलक लावले आहेत. त्यामुळे आ. योगेश कदम यांच्या विरोधात अजिंक्य मोरे मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
खेड तालुक्यातील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्या सोबतच राहतील, असा ठराव शनिवारी झालेल्या शिवसेना तालुका कार्यकारणीच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आलेला आहे. खेड व दापोलीतील शिवसेना पदाधिकार्यांनी आ. कदम हे शिवसेनेतच असून, आम्ही त्याच्यापाठीशी खंबीर उभे राहणार असा निर्धार केला असला तरी युवासेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आम्ही शिवसेने सोबत ठाकरेंसोबत असे फलक शहर व परिसरात लावून त्यांनी आ. कदम यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या फलकावर त्यांनी युवासेना पदाधिकार्यांचे फोटोदेखील प्रसिद्ध केले आहेत.
फलकावर सुरवातीला युवासेना व नंतर शिवसैनिकांचा उल्लेख करत तालुका शिवसेनेला एक प्रकारे डिवचण्याचाच प्रयत्न केल्याची चर्चा आहे. अजिंक्य मोरे हे गेल्या काही वर्षांपासून युवासेनेचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आ. भास्कर जाधव व ना. उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते ना.नारायण राणे यांच्या विरोधात केलेले आंदोलन व भाजपच्या शहरातील कार्यालयात जावून केलेली तोडफोड यामुळे मोरे चर्चेत आले होते.
आता खेड तालुक्याचे आ. योगेश कदम शिंदे समर्थक असताना अजिंक्य मोरे यांनी कदम यांच्याच मतदार संघात ठाकरे समर्थक म्हणून फलक बाजी केल्याने खेड मध्ये एकच चर्चा सुरू आहे. मोरेंच्या माध्यमातून युवा सेनेची मजबुत फळी तयार होत आहे. अनेक युवासैनिकांच पाठबळ मोरेंच्या पाठीशी असल्याने तालुक्यातील युवासेना व शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.