
पुढारी ऑनलाईन डेस्क : बंडखोर आमदारांपैकी २० ते २१ आमदार आमच्या संपर्कात आहेत, दादागिरीने बंडखोर आमदारांची मने जिंकता येणार नाहीत. गुवाहाटीतील काही आमदारांची अवस्था कैद्यासारखी आहे,आमदारांची मने दादागिरी करून जिंकता येणार नाहीत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. बंडखोरांपैकी १०-१२ आमदारांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील, असे आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना सांगितले.
आमदार नितीन देशमुख, कैलास पाटील हे गुवाहाटीतून परतले. शिंदे गटातील आमदारांना बंड करायचे होते, तर महाराष्ट्रात राहून करायचे होते. कोरोना काळात जगभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक झाले. बंडखोर आमदारांना याचा अभिमान वाटायला हवा होता. मात्र, आमदारांनी बाहेरच्या राज्यात जाऊन बंड केले, अशी खंतही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.
बंडखोर आमदारांमुळे शिवसेनाला काहीही फरक पडणार नाही. ठाणे आणि डोंबिवलीतून मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. बंडखोर आमदारांना डोंगर पाहायचा होता, तर महाराष्ट्रात सह्याद्रीचा पहायचा होता. बंडाला आपण संकट म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहत आहोत. फुटीरतावाद्यांवर विश्वास ठेवला, ही चूक झाली. फुटीरतावाद्यांसाठी भाजपकडून यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सत्य बंडखोर आमदारांच्या बाजूने असतं, तर यांनी बंड केले नसते. बंडखोर आमदारांमध्ये ताकद नव्हती, मनगटात ताकद नव्हती, म्हणून सुरतला जाऊन त्यांनी बंड केले, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचलंत का?