
सावंतवाडी, पुढारी वत्तसेवा : महाविकास आघाडीतून जे आमदार फुटून गेले आहेत त्यातील अनेक आमदार हे पुन्हा परतीच्या मार्गावर असून यावर्षीची विठ्ठलाची महापूजा ही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून करतील, असा मला ठाम विश्वास आहे. केसरकर तीन पक्षाचे झाले नाहीत ते शिंदे गटाचे तरी काय होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला आहे.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे-परब,रेवती राणे, पुंडलिक दळवी,काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर, चित्रा बाबरदेसाई आदी उपस्थित होते.आ.दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर कितीही टीका केली तरी कागद बदलू शकणार नाही.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात किती निधी दिला हे सर्वानाच माहित आहे.अनेक प्रकल्प मार्गी लागले असतानाही आपली छबी चमकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर केसरकर टीका करत आहेत.त्यांनी आतापर्यंत अनेकांचा विश्वासघात केला हे सर्वानाच ज्ञात असल्याचे भोसले यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात नाही.जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत.त्यातील 20 ते 22 आमदार पुन्हा येणार आहेत.येत्या काळात ते कळेल पण यावर्षीची विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.विधिमंडळाचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी दिलेली नोटीस योग्य असून उपाध्यक्षांना अध्यक्षांचे अधिकार आहेत. केसरकर हे चुकीची वकीली करत असून सिंधुरत्न योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनशे कोटी रुपये दिले. तरीही त्यांचे रडगाणे काही जात नाही. त्यांनी वेळोवेळी दहशतवादाचा बागुलबुवा केला.
आताही तसेच करत असून हे सर्व ते मंत्रिपदासाठी करत आहेत अशी टीका प्रवीण भोसले यांनी केली. मुळात केसरकर यांचे विचार काँग्रेसशी मिळते जुळते आहेत. म्हणून त्यांची आमची दोस्ती होती. त्यांचे वडीलही काँग्रेसच्या विचारांचे होते असे श्री.भोसले म्हणाले.