राजापूर ः पुढारी वृत्तसेवा  मुस्लीम धर्मामध्ये पवित्र हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुस्लीम समाजातील प्रत्येकाने जीवनात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असे सांगितले जाते. या यात्रेसाठी केरळ येथील सिहाब चित्तूर हा तीस वर्षीय तरूण पायी निघाला आहे. त्याचे राजापुरात आगमन होताच येथील मुस्लिम बांधवांनी जोरदार स्वागत केले.

सन 2023 च्या हज यात्रेसाठी या तरुणाचा हा पायी प्रवास सुरू झाला असून, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण असा प्रवास करून सौदीअरेबियामध्ये मक्‍का येथे हा तरूण पोहचणार आहे. मुस्लीम धर्माची शिकवण, संस्कृती आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न या यात्रेतून करत असल्याचे या तरुणाने सांगितले. राजापुरात दाखल झालेल्या या तरुणाचे राजापुरातील विविध मुस्लीम संघटना आणि युवकांनी उस्फूर्त स्वागत करत त्याला शुभेच्छा दिल्या.

शनिवारी रात्री तिवंदामाळ येथे मुक्‍काम करून हा तरूण रविवारी सकाळी पुढे मार्गस्थ झाला. 30 मे रोजी हा तरुण केरळ येथून पायी हज यात्रेसाठी निघाला आहे. राजापुरात दाखल झालेल्या या तरुणाचे राजापुरातील दारूल हबीब मद्रसा, मधीलवाडा जमात राजापूर यांसह शहर व तालुका परिसरातील मुस्लीम बांधवांसह युवकांनी उस्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व दारूल हबीब मद्रसाचे अध्यक्ष निजाम काझी, मुफ्ती निजाम उस्ताद, मधीलवाडा जमातीचे इरफान ठाकूर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here