
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा शासनाने एकल प्लास्टिक वापरावर 30 जूनपासून बंदी आणली आहे. 30 जूननंतर या प्लास्टीकचा वापर करणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यापूर्वीच चिपळूण नगर परिषदेने आजअखेर सुमारे टनभर एकल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
एकल प्लास्टिक अर्थातच पुनर्विघटन व वापर न होणार्या प्लास्टिकचा सुळसुळाट झाला आहे. स्वस्त आणि त्वरित उपलब्ध होणार्या प्लास्टिकच्या काळ्या-पांढर्या पिशव्या निसर्गाला घातक ठरत आहेत. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या व प्लास्टिक अर्थातच एकल प्लास्टिक वापरावर शासनाने 1 जुलैपासून पूर्णत: बंदी आणली आहे. निसर्गाला घातक असलेले एकल प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी चिपळूण न.प. प्रशासनाने देखील कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी विक्रेत्यांकडून एकल प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजअखेर सुमारे टनभर काळ्या, पांढर्या, गुलाबी, हिरव्या, निळ्या अशा एकल प्लास्टिक पिशव्या न.प. प्रशासनाने जप्त केल्या आहेत.
फळ विक्रेते, भाजी विक्रेते या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ग्राहक परत जाऊ नये म्हणून स्वस्त आणि लगेच उपलब्ध होणार्या पिशव्यांतून खरेदी करणार्या ग्राहकांना खाद्य वस्तू दिल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पिशव्या बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना पुरविल्या जात आहेत.
हेही वाचा