रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या चार तालुक्यांमध्ये मागील चौवीस तासात अतिवृष्टीचा फटका बसला. सर्वाधिक 116 मिमी पाऊस लांजा तालुक्यात नोंदवला गेला आहे. 2 जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिमुसळधारस्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टीवर 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने 29 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40-50 किमी ते 60 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्यचा  इशारा दिला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन केले आहे तर 28 जून ते 2 जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गेल्या 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात 116 मिमी नोंदला गेला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यात 27 जून रोजी मौजे गिमवणे, येथील ग्रुप ग्रामपंचायत इमारतीला लागून असलेली 25 फुट लांब संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे पडल्याने अंदाजे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे पंढरी, ता.दापोली येथील रघुनाथ हरिश्चंद्र श्रावणपाटील यांच्या घराची संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात 27 जून रोजी रात्री मौजे दाभोळे येथे तुकाराम गंगाराम शिवगण यांच्या मालकीचे पाच जनावरे अचानक मरण पावली. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here