
रायगड : पुढारी वृत्तसेवा : अपूर्णावस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येत्या जुलै महिन्यात टोलनाका सुरू होणार आहे. टोलनाक्यामुळे पनवेल ते माणगावपर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे ते वडखळ या अंतरावरील रस्ता तयार झाल्यामुळे वाहनांना टोल आकारला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात येत आहे.
दोन दशकांहून अधिक काळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. राज्यातील सत्तांतरासोबत गेल्या दहा वर्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रडतखडत काही अंशी काम झाले आहे. कोकणात जाताना पळस्पेपासून सुरू होणार्या मार्गावर अनेक ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. कोविड काळात या रस्त्याचे काम संस्थगतीने झाले, परंतु आता पळस्पे ते वडखळ या 0 ते 42 किलो मीटर दरम्यानच्या अंतराचे काम पूर्ण झाल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. त्यामुळे खारपाडा पुलाजवळ महामार्ग प्राधिकरणातर्फे टोलनाका उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. कोकणात जाणार्या मार्गावर वडखळ सोडल्यास नागोठणे, इंदापूर, माणगाव या दरम्यानचे रस्त्यांचे रुंदीकरण आणि काही ठिकाणी रस्ते जोडण्याचे काम अपूर्ण आहे, परिस्थितीत पनवेलहून माणगाव आणि त्यापुढे जाणार्या प्रवाशांना फटका बसणार आहे.
जुलैपासून खिशाला कात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारपाडा येथे टोलनाका तयार
करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा टोलनाका सुरू करण्यासाठी वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु टोलनाका सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवलेले प्रस्तावावरून अद्याप परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. मात्र जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून हे परिपत्रक लागू झाल्यास कोकणात जाणार्यांना टोल भरावा लागणार आहे.