गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा : शाळेत जाण्यावरून वडील रागावले म्हणून गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वरभाटी येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. पारस विकास पालशेतकर (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबतची माहिती विकास भाग्या पालशेतकर (48) राहणार वेळणेश्‍वर भाटी यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दिली. यानुसार, पारस विकास पालशेतकर (15) हा न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्‍वर येथे इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. मला शिकायचे नाही त्यामुळे मी शाळेत जाणार नाही, असे त्याचे म्हणणे होते. यावरून त्याचे वडील विकास हे पारसवर रागावले. मात्र याचा राग मनात धरून पारस घराच्या माळ्यावरील एका खोलीत जाऊन बसला. बराच वेळ झाला तरीही पारस खाली आला नाही म्हणून त्याचे वडील त्याला खाली आणण्यासाठी गेले असता त्यांना धक्‍का बसला. पारसने लोखंडी खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावल्याचे त्यांना आढळले. वडिलांनी लगेचच नायलॉनच्या दोरीमधून पारसला सोडवले व उपचाराकरिता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी पारसला मृत असल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राने गुहागर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सहकार्‍यांसह प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे जाऊन पंचनामा केला. बुधवारी सकाळी पारसचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने गुहागर तालुका हळहळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here