रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी तीन दिवस दक्षिण कोकणासह उत्तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असून किनारी गावांसह दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी पावसाने सकाळी थोडी उसंत घेतली होती. मात्र, पावसाने दुपारनंतर पुन्हा संततधार कोसळण्यास सुरुवात केली. काही भागात पावसाने जोरदार झोडपले. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानंतर आता दुसर्‍या पंधरावड्याच्या अंतिम टप्प्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. दुपानंतर काही भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, मंगळवारी तब्बल 72 मि.मी.च्या सरासरीने झोडपून काढल्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने उसंत घेत काही वेळ उघडीप दिली होती. मात्र संध्याकाळी पुन्हा पावसाने आघाडी घेतली होती. बुधवारी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 12 मि.मी.च्या सरासरीने 108 मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 25 मि.मी., दापोली आणि संगमेश्‍वर प्रत्येकी 13, खेड 4, गुहागर व चिपळूण प्रत्येकी 6, रत्नागिरी 12, लांजा, राजापूर तालुक्यात अनुक्रमे 22 आणि 7 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 588 मि. मी.च्या सरासरीने 5294 मि.मी. एकूण पाऊस झाला. गतवर्षाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ निमपटच पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत 1181 मि.मी. च्या सरासरीने पावसाने साडेदहा हजारी मजल पूर्ण केली केली होती.

दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यासह कोकणातील दोन्ही विभागात जोरदार वार्‍यासह अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालवधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात सज्जतेच्या सूचना करण्यात आल्या असून दुर्गम भागातही सावधगिरी आणि खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here