चिपळूण , पुढारी वृत्तसेवा :   दोन दिवस कोसळणार्‍या पावसामुळे आणि योग्य पद्धतीने काँक्रिटीकरणाचे काम न झाल्याने अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटातील काँक्रिटीकरणाला मोठे तडे गेले आहेत. या ठिकाणची माती खचली असून, महामार्ग धोकादायक बनल्याने अखेर जुन्या रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.

गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. कामथे घाटातील रस्ता याचवर्षी काँक्रिटीकरण करून तयार करण्यात आला होता. वास्तविक, रस्त्याचा भराव केल्यानंतर त्यावर एखाददुसरा पावसाळा जाऊ द्यायचा असतो. त्यानंतर खडीकरण, मजबुतीकरण व काँक्रिटीकरण करायचे असते. मात्र, चौपदरीकरण तातडीने व्हावे यासाठी केलेल्या भरावावर लगेच काँक्रिटीकरण करण्यात आले. शिवाय या ठिकाणी पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग ठेवण्यात आला नाही. अखेर दोन दिवस पडणार्‍या संततधार पावसात कामथे हरेकरवाडी येथील जमीन खचली आणि काँक्रिटीकरणाला मोठी भेग पडली आहे.

त्यामुळे या मार्गावरून वाहतूक धोकादायक बनली आहे. याची तत्काळ दखल घेत तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पेालिस निरीक्षक रवींद्र शिंदे व ईगल कंपनीच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. यंत्रणेच्या माध्यमातून जुन्या डांबरी रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here