
सावंतवाडी , पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते व सावंतवाडी मतदारसंघाचे आ. दीपक केसरकर यांचा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. शाल, पुच्छगुच्छ देत दीपक केसरकर यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आता आ. केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे.
आ.केसरकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांची भूमिका ठामपणे मांडली व शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना सडेतोड उत्तरे दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याही टीकेला उत्तर दिले त्यामुळे त्यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोवा येथे करण्यात आला.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांनी गेले दहा दिवस एकहाती खिंड लढवली आहे. देशभरातील मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांसमोर आ. केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागील वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडली. आम्ही शिवसेनेत आहोत व यापुढेही शिवसेनेतच रहाणार, आमची लढाई तत्वांशी आहे, असे सांगत कुणाचीही गुंडगिरी, दहशत खपवून घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
आ. केसरकरांच्या या प्रभावी कामगिरीचे बक्षिस म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद नक्की मिळेल, अशी चर्चा आहे. तसे झाले तर राज्याचे माजी आरोग्य मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या नंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळविणारे आ. केसरकर हे सावंतवाडीचे दुसरे आमदार ठरतील. यापूर्वी आ. केसरकर हे शिवसेना-भाजप महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गृह वित्त व नियोजन राज्यमंत्री होते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीची पोस्ट फिरत होती. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यामध्ये आ. केसरकर यांना महसूल राज्यमंत्री पद देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्याने आ. केसरकर यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे.