कणकवली, पुढारी वृत्तसेवा :  कणकवली रेल्वे स्टेशनच्या लोखंडी शेडच्या छपरातून पावसाचे पाणी गळत असल्याने रेल्वे स्टेशनच्या आतील भागात पाणीच पाणी झाले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील भाग कोरडा होता, मात्र स्टेशनवरील शेडच्या छपरातून पावसाचे पाणी येत असल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होत होती.

सिंधुदुर्गात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवार सकाळपासून कणकवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने त्याचा त्रास छपराच्या गळतीमुळे कणकवली स्टेशनवर येणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी नव्याने उभारण्यात आलेल्या या स्टेशनच्या छपराला सध्या ठिकठिकाणी गळती आहे. त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवर आल्यानंतर सुरक्षित जागा शोधावी लागते.

कणकवली रेल्वेस्टेशनवरील सरकता जिनाही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. कोविड कालावधीमध्ये हा जीना बंद करण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे हा सरकता जीना बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना स्टेशनवर पोहोचणे त्रासदायक बनते. त्यामुळे कणकवली स्टेशनवर सरकत्या जीन्याची समस्या कायम असताना आता छपराच्या गळतीमुळे त्याचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here