
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राजकीय घडामोडींचा पुन्हा एकदा रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीमध्ये राजकीय परिणाम पहावयास मिळणार आहे. तीन वर्षांपूर्वी अचानक शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी झाली. रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीवर या घडामोडींचा परिणाम झाला. त्यावेळी शिवसेना वगळता इतर पक्षांची शिवसेना उमेदवाराविरुद्ध होणारी संभाव्य शहरविकास आघाडी होऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी गटबंधन होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीने आपले राजकारण सुरु केले आहे. रत्नागिरीतील राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. आ. उदय सामंत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुका पुढील साडेतीन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. परंतु, राष्ट्रवादीचे संघटन कमकुवत झाल्याने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करून रनपवर सत्ता कशी आणायची, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबते सुरु होती. परंतु, आता आ. सामंत शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्याने मुळची उद्धव ठाकरे यांची शिवसेना अडचणीत येणार हे राष्ट्रवादीने ओळखले. आता या मूळ शिवसेनेलाही नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार शोधावे लागतील. अशा वेळी राष्ट्रवादीची मदत मिळून आघाडीने निवडणूक लढवता येईल, असे संकेत देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.
तीन वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व इतर विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध शहरविकास आघाडी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आवश्यक ती बोलणी त्या त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झाली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना – भाजप युती तुटली आणि रत्नागिरीतील शहरविकास आघाडीचे राजकारण सुद्धा बदलले. राष्ट्रवादी आणि भाजपचे स्वतंत्र उमेदवार उभे राहिले होते. यामध्ये शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी निवडून आले.
शिवसेनेच्या एबी फॉर्मचा संभ्रम
राज्यातील सत्तांतर घडामोडीने शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. खरी शिवसेना कोणती? याची न्यायालयीन स्तरावर लढाई होणार आहे. अशावेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार कोण ठरणार? त्यांना उमेदवारीचा पक्षीय एबी फॉर्म कोण देणार? या प्रश्नांचे सध्या उत्तर नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल आहे. याचाच लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादीने मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी रत्नागिरीतील राष्ट्रवादी असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.