सावंतवाडी : आंबोली येथील मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यापासून आंबोलीत रविवारी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. मुख्य धबधबा येथे वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणार्‍या पर्यटकाकडून आंबोली ग्रामपंचायतीने कर आकारणी करण्यास सुरुवात केल्यामुळे पर्यटकानी नाराजी व्यक्त केली. आंबोलीतील सर्व धबधबे प्रवाहित झाल्यामुळे येथील वर्षा पर्यटन दोन वर्षांनंतर चांगलेच बहरले आहे.

दरवर्षीप्रमाणे आंबोली वर्षा पर्यटनाला दमदार सुरुवात झाली आहे. या भागातील सातही पर्यटनस्थळावर शनिवारीपासून पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यात पर्यटकांचे आवडते कावळेसाद व शिरगांवकर पॉईंटना पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून, रविवारी दुसर्‍या दिवशी तर आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली. यावेळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज झाली असून, मुख्य धबधबाच्या ठिकाणी चाळीस पोलिस कर्मचारी व दहा होमगार्ड तैनात करण्यात आले होते. आंबोली अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी सर्व पॉईंट वर दीडशे हुन अधिक पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, अभी कांबळे, राजेश नाईक, संभाजी पाटील आदींनी सर्व पॉईंटवरचा आढावा घेतला. पर्यटकांनी बेशिस्तपणे वाहने पार्किंग केल्याने आंबोली येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. पर्यटकांची गर्दी आवरती घेत पोलिसांनी त्यांना आवरण्याचे काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here