मडुरा; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील एक आगळी ओळख निर्माण करणारे येथील गणपती मूर्ती कारागीर उपेक्षितच आहेत. मागील सरकार उदासीन होते. त्यामुळे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील मूर्तिकारांना प्रोत्साहन अनुदान व प्रति मूर्तीमागे मानधन देऊन कोकणातील मूर्तिकारांना न्याय द्यावा, अशी मागणी कोकणातील गणेश मूर्तिकारांमधून होत आहे.

यावर्षी मातीचा दर दुपटीपेक्षा जास्त वाढवून पंधरा हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक भाडे, मजुरी वाढणार आहे. गोवा सरकार मूर्तिकारांना प्रत्येक मूर्तीमागे 200 रुपये मानधन देते. जलप्रदूषण थांबावे यासाठी मातीच्या मूर्तीकामास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे मानधन दिले जाते. आज मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मुर्त्या सिंधुदुर्गात आणल्या जातात. त्यामुळे जो खरा कलाकार आहे त्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हरित लवादाने सद्यस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणली आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील मूर्तिकारांना प्रथम प्राधान्य प्रोत्साहन देऊन प्रति मूर्तीमागे मानधन देऊन कोकणातील मूर्तिकारांना प्राधान्य द्यावे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कडक बंदी आणून अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय घ्यावा, अशी मागणी कोकणातील मूर्तिकारांची आहे.

आमचे आजोबा कै. गुणाजी वासुदेव गवंडे यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून 1953 मध्ये निगुडेसारख्या ग्रामीण भागामध्ये गणेश चित्र शाळा सुरू केली होती. ते एखादे कॅलेंडर पाहून हुबेहूब मूर्ती बनवायचे. आज आमची तिसरी पिढी या कलाक्षेत्रात काम करते. सुमारे 100 गणेश मूर्ती या गणेश चित्रशाळेत बनविल्या जातात. गोवा राज्यात मातीच्या पर्यावरणपूरक गणपतींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वयाच्या 14 वर्षांपासून मी माझ्या आजोबांसोबत गणेश मूर्ती बनवायला शिकलो. त्यामुळे ‘कलेनेच दिला आयुष्याला अर्थ’ असं म्हणावं लागेल.

– गुरुदास गवंडे, गणेश मूर्तिकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here