
महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड पोलादपूर शहरासह लगतच्या ग्रामीण परिसरात गेल्या बारा तासांपासून तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. या मोसमातील पावसाने पहिल्याच तडाखा दिला आहे. पोलादपूर लगतच्या चोळई गावात दरड कोसळल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त झाली आहे. महाड शहरालगत मुंबई – गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर गटाराअभावी पाणी साचल्याने सुंदरवाडीपासून गांधार पालेपर्यंत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गांधारपाले व दासगावामध्ये काही घरात पाणी शिरल्याचे वृत्त झाले आहे. दरम्यान शहरातील स्टेट बँकेमध्ये पाणी साचले असून विविध सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. सावित्री नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरपेक्षा जास्त वाढल्याने नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देणारा भोंगा वाजविण्यात आला आहे. शहरात शाळा क्रमांक ५ जवळ झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महाड नगरपालिका, महाड महसूल प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचे इशारे दिले असून आणीबाणीच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या हवामान खात्याने पुढील २ ते ३ दिवस रायगडसह कोकणात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असे सूचना दिल्या आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता सावित्री नदीची पातळी ५ मीटरपेक्षा जास्त झाली आहे.
हेही वाचलंत का ?