रत्नागिरी :  landslide in Parshuram Ghat : मुंबई – गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील वाहतूक अजूनही ठप्पच आहे. काल या घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे या घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळी चार वाजता बंद झालेली वाहतूक अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज घाटाची पाहणी करुन वाहतूक सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

दरम्यान, येत्या 4-5 दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रात्रभर जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी दिसून येत होते.

कोकणात मुसळधार पाऊस सुरु

 

दक्षिण कोकण आणि गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय. रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. कोकणात पुढील काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत.

कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरून वाहात आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं, तसंच जीवितहानी होऊ न देणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचे निर्देश दिलेत. 

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले 

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. महाड शहरातील नद्यांच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दस्तुरी नाका ते रायगड रोड  मार्गावर पाणी आहे. पाऊस सुरुच असल्याने पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. दिवसभरात 140 मी मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here