दापोली; प्रवीण शिंदे: पावसाळा सुरू होण्याआधीच पूर्वीच्या महिला इरले आणि शेतकरी हे घोगडीची व्यवस्था करून ठेवत असत. मात्र, हेच इरले आता नामशेष झाले असून, त्याची जागा प्लास्टिक आणि रेनकोटने घेतली आहे. घोंगडी देखील दुर्मीळच झाली आहेत.त्या काळात इरलेची शेतीसाठी अत्यंत गरज होती. पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे दोर काढून इरले बनवीत असत. त्यामुळे मुसळधार पावसात हे इरले महिलांना
एक आधार होता.

पावसाळा सुरू झाला की, शेतकरी इरले बनविणासाठी कारागिरांना सांगत असायचे. तर कारागीर देखील उत्तम प्रकारचे इरले बनवून देत असत. त्यामुळे ही पारंपरिक कला देखील जोपासली जाऊन काही पैसे देखील कारागीर यांना मिळत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इरले नामशेष झाल्याने इरले बनविणारे कारागीर राहिले नाहीत. नव्या पिढीने देखील ही कला अवगत केली नाही. त्यामुळे आताच्या पिढीला हे इरले चित्रात दाखवावे लागत आहेत.

घोंगडी देखील पूर्वी शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खरेदी करून ठेवत असत. घाटमाथ्यावरील घोंगडी विक्रेते हे प्रत्येक हंगामात कोकणात प्रत्येक घरात घोगंडीची विक्री करत असत. ही घोंगडी शेतकरी चांगली मळून वापरात आणायचे. पावसात ती शेतकर्‍यांला साथ देत असे तर थंडीत देखील या घोंगडीची चांगली ऊब मिळायची. मात्र, कालांतराने घोंगडी शेतकर्‍यांचे डोक्यावरून उतरली आणि त्याची जागा रेनकोटने घेतली आहे.

पावसाळा सुरू झाला की बाजारात रंगीबेरंगी प्लास्टिक कापड, रेनकोट, टोपी आदी विक्रीसाठी उपलब्ध असतात.पावसाळ्यात शेतकरी या रेनकोट आणि प्लास्टिकची खरेदी करतो. इरले अनेक वर्ष शेतकरी महिलांना साथ देत होते.मात्र रेनकोट आणि प्लास्टिक कापड दरवर्षी शेतकर्‍यांना खरेदी करावे लागत आहे. दापोली तालुक्यात आणि जिल्ह्यात शेती करण्यासाठी मनुष्यबळ कमी झाले. पारंपरिक शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात शेतीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाल्याने बैल, रेडे हे देखील शेतकर्‍यांनी बाळगणे कमी केले. त्यामुळे अनेक पारंपरिक अवजारे देखील नजरेआड होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here