सिंधुदुर्ग/रत्नागिरी; गणेश जेठे: आ. दीपक केसरकर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील ‘टॉप
लीडर’ म्हणून वेगाने पुढे येत आहेत. प्रवक्‍ता म्हणून शिंदे गटाची बाजू मांडत शिवसेनेवर प्रभावी पलटवार करणार्‍या केसरकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. मुख्यमंत्र्यांनी खास गोव्यात येऊन त्यांचा गौरव केलाच, त्याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही कालच्या विधिमंडळ अधिवेशनात केसरकरांचे आपल्या खास शैलीत कौतुकही केले. केसरकर अर्थातच शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनण्याची दाट शक्यता आहे.

तसे घडलेच तर तळकोकणातील राजकारणात त्यांचा दबदबा वाढेल आणि त्यामुळे राजकीय समीकरणेही बदलू शकतात.दीपक केसरकर हे प्रथम काँग्रेसमध्ये होते. मग ते 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केल्यानंतर राष्ट्रवादीत गेले. ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले. नंतर आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी काँग्रेसचे मंत्री असलेल्या नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत मदत करणे केसरकरांना पटले नाही, म्हणून राष्ट्रवादी सोडून त्यांनी शिवबंधन बांधले. शिवसेनेत असतानाच ते फडणवीस मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून त्यांची नाराजीही दिसली होती. परंतु सिंधुरत्न विकास योजनेचे अध्यक्षपद देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न शिवसेना नेतृत्वाने केला होता. अखेर ते शिंदे गटात सामील झाले. तीनवेळा आमदार म्हणून निवडून येणे, राज्यमंत्री म्हणून कामाचा अनुभव असणे आणि राजकीय भूकंपाच्या काळात शिंदे गटाचे प्रवक्‍ते म्हणून मोठ्या कौशल्याने आपल्या गटाची बाजू मांडणे हे लक्षात घेता दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री होतील, असे सध्याची स्थिती सांगते. त्यांच्याकडे महसूल खाते दिले जाईल, अशी चर्चा आहे.

राणे यांच्याबाबत केसरकर यांची भूमिका बदलेल का?

शिंदे गटात दीपक केसरकर असले तरी राज्यात आता भाजप आणि शिंदे गट यांचे युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे भाजपाचे तळकोकणातील नेते आहेत. आजवर गेली अनेक वर्षे केसरकर यांनी राणे यांच्याविरोधात सातत्याने भूमिका घेतली आहे. आता मात्र भाजपसोबत युतीमध्ये सरकारमध्ये सहभागी असलेले केसरकर यांनी राणे यांच्या बाबतीतील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. केसरकर राणे यांच्याबाबतची आपली भूमिका आता बदलतील का? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here