कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग विमानतळावर सध्याच्या पावसाळी हवामानामुळे विमान लॅन्डिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा खराब हवामानामुळे विमान रद्द करण्यात आले. सलग तीन दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे, त्यामुळे या पावसाळी मौसमात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे असल्याचे बोलले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपीच्या माळरानावर ९ ऑक्टोबर २०२१ रोजी अलायन्स एअर कंपनीचे ७२ आसनी प्रवासी विमान सुरू झाले. या विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. विमानसेवा सुरू झाल्यापासुन चार ते पाच वेळा विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली. सिंधुदुर्गात पावसाळी मौसम सुरू झाला असून या पावसाळी मौसमात पायलटला धावपट्टी स्पष्टपणे दिसत नाही. परिणामी गेले तीन दिवस विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली. विमानसेवा रद्द झाल्यामुळे महत्वाच्या कामास सिंधुदुर्ग वरून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी परवड झाली.

विमानसेवेपेक्षा आता रेल्वे सेवाच बरी असल्याचे प्रवासी वर्गामधून बोलले जात आहे. खरं तर खराब हवामानात विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणारी अद्यायावत यंत्रणा विमानतळावर बसविण्यात न आल्यामुळे अलायन्स एअर कंपनीला अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच या पावसाळी मौसमात वारंवार विमानसेवा बंद होत असल्यामुळे पाऊस संपेपर्यंत विमानसेवा राम भरोसेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचंलत का?

 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here