शिरगाव/ संतोष साळसकर : पावसाने गेले काही दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. साेमवारपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. काही धबधबे सर्वांच्या परिचयाचे आहेत तर काही दुर्लक्षित राहिले आहेत. असाच एक देवगड तालुक्यातील साळशी गावातील “केगदी धबधबा” हा पर्यटकांचे लक्ष आकर्षून घेत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असा हा धबधबा येणाऱ्या पर्यटकांना  मनमुराद आनंद देताे.

देवगड तालुक्यातील साळशी गावात संत श्री सिध्देश्वर आणि ८४ खेड्यांची अधिपती श्री.पवणाई देवी ही दोन मुख्य देवालये आहेत. तर दक्षिणेला “सदानंद गड” वसलेला आहे. त्यामुळे या गावात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. या गावच्या पूर्वेला अतिप्राचीन महाकाय वटवृक्षाखाली श्री. देव वटेश्वर मंदिर आहे.

याच मंदिरापासून केवळ ५ मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर निसर्गरम्य परिसरात हा “केगदी” धबधबा सद्या ओसंडून वाहत आहे. याच धबधब्याच्या बाजूस बारमाही वाहणारा पाण्याचा नैसर्गिक झरा असून पश्चिमेला इतिहासकालीन तळे आहे. याच परिसरात निसर्गसौंदर्याने नटलेला केगदी धबधबा सद्या पर्यटकांना साद घालत आहे. अतिशय छोट्या परिसरात वसलेला हा धबधबा येणाऱ्या पर्यटकांना अतिशय सुरक्षित असा आहे. दरवर्षी या धबधब्यावर काही पर्यटक येत असतात. मात्र अजूनही म्हणावा तसा हा धबधबा सर्वांच्या परिचयाचा झालेला नाही.

 केगदी धबधबा पाहण्‍यासाठी कसे जाल? 

केगदी धबधब्याच्या ठिकाणी कणकवलीहून तरंदळे- भरणी – चाफेड मार्गे सुमारे २० कि. मी. अंतर आहे. देवगड – नांदगाव या मुख्य मार्गावरून शिरगाव येथून सुमारे ८ किलाेमीटर अंतर आहे. शिरगावहून साळशीला आल्यावर साळशी पिंपळ पार येथून चाफेडकडे जाणाऱ्या मार्गाने जाता येते.

 

हेही वाचा  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here