सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले आंबोली ची प्रति महाबळेश्वर म्हणूनही राज्यात वेगळी ओळख आहे. दरवर्षी पावसाळ्यात आंबोली येथील वर्षा पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळतो. नैसर्गिक साधन सामग्रीने नटलेल्या व विपुल वन्यजीव संपदा लाभलेला आंबोलीतील मुख्य धबधबा आता प्रवाहीत झाला असून, शनिवारी, रविवारी हजारो पर्यटक वर्षा पर्यटनानिमित आंबोलीला भेट देत आहेत. आंबोलीतील यावर्षीच्या वर्षा पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात झाली आहे.

कोकणात मान्सूनची जोरदार सुरूवात झाल्यानंतर आंबोलीतील प्रसिद्ध वर्षा पर्यटन आता सुरु झाले आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे आंबोलीतील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाने आंबोलीवर मुक्त हस्ताने उधळण केली आहे. दऱ्या- खोऱ्या, उंच डोंगर- कडे- कपारे तसेच नैसर्गिक सौंदर्याने, विपुल वन्यजीव संपदासोबत थंड हवा, भरपूर पाऊस, दाट धुके, सतत बदलत असणारे हवामान यामुळे पावसाळ्यात येथील वातावरण स्वर्गाहून अधिक अनुभूती देणारे ठरते. यावर्षी आंबोली मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्यामुळे आंबोलीचे वर्षा पर्यटन बहरले आहे. पहिल्याच शनिवारी रविवारी विकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक राज्यातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने आंबोली येथे पर्यटक भेट देतात. आंबोलीतील उंच डोंगरावरून कोसळणारा पांढरा शुभ्र मुख्य धबधबा हा येथील प्रमुख आकर्षण आहे. त्याच्याबरोबर प्रसिद्ध कावळेसाद पॉईंट देखील पर्यटकंचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. या रविवारी आंबोलीत दाखल झालेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चार अधिकारी, चाळीस पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदी तैनात करण्यात आले आहेत.

बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकावर आंबोली ग्रामपंचायतीने स्वछता कर घेण्यास सुरुवात केली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आंबोली येथील वर्षा पर्यटन स्थगित ठेवण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या वर्षी सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करून हे पर्यटन पुन्हा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आंबोलीचे वर्षा पर्यटन चांगलेच बहरले आहे.

मुख्य धबधबा, शिरगांवकर पॉईंट, कावळेसाद पॉईंटला पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आंबोलीत पर्यटनसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतीने स्वागताचे फलक लावले आहेत. आंबोली येथे शासनाने दीड कोटी रुपये खर्चून फुलपाखरू उद्यान उभारले आहे. त्याकडे ही पर्यटक आकर्षित होताना दिसत आहेत. दर विकेंडला पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने वाहनाच्या ट्राफिकचा प्रश्न उभा राहत आहे त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

आंबोली धबधबा येथे कसे जावे?

आंबोली येथे यायचे झाल्यास सिंधुदुर्ग सावंतवाडीपासून तीस किमी तर कोल्हापूर येथील पर्यटक आजरा -निपाणी मार्गे आंबोलीत येऊ शकतात. कर्नाटक राज्यपासून आंबोलीचे अंतर अवघे ७० किमी असून बेळगाव येथून पर्यटक वेंगुर्ला- बेळगाव आंतरराज्य मार्गे आंबोलीत दाखल होऊ शकतात. अगदी एका दिवसात आंबोली ट्रिप व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकते.

हेही वाचलंत का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here