
ओरोस;पुढारी वृत्तसेवा: जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला 14 वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील 60 गावे सागरी उधाणाच्या छायेत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 13 ते 17 जुलै व 30 व 31 जुलै दरम्यान मोठ्या उधाणाची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून समुद्र खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रालगतच्या गावांना, वस्त्यांना स्थानिक तहसील प्रशासनामार्फत नोटिसा दिल्या जातात. मात्र, किनारपट्टीवरील नागरिकांचा मच्छीमार व्यवसाय असल्यामुळे नोटीस देऊन हे नागरिक अन्यत्र जाण्यास उत्सुक नसतात.
यावर्षी संभाव्य सागरी उधाणांची शक्यता विचारात घेऊन हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीवरील 60 गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यामध्ये देवबाग तारकर्ली निवती, वेळागर, तांबळडेग, विजयदुर्ग, धालवलीयासह अन्य मिळून 60 गावांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्हयातील गावखडी, हर्णे बंदर, कळंबादेवी, दाभोळे, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी आंबोळगड, जैतापूर, नाटे आदी गावांचा समावेश आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास व त्याचवेळी समुद्राला उधाण आल्यास किनारपट्टी व खाडी लगतच्या गावांमध्ये, वस्तींमध्ये उधाणाचे पाणी घुसण्याचा धोका आहे.