चिपळूण;  पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आ. भास्कर जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आता पुढच्या काळात शिवसेनेची मशागत करण्यातच आपल्याला आनंद आहे. ही मशागत करून राज्यभरात चांगले पीक कसे येईल, यासाठी प्रयत्न आहे. शिवसेनारूपी शेत शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्याच नावावर केले आहे. त्यावर कुणाचाही अधिकार नाही, असे यावेळी आ. जाधव यांनी सांगितले.

आ. जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी आ. जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. विशेषकरून संपूर्ण कुटुंब भात लावणीसाठी शेतात उतरते व सर्व कामे एकत्रित केली जातात.

या संदर्भात आ. जाधव यांना विचारले असता, वडिलांनी घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे दरवर्षी आम्ही लावणीसाठी शेतात उतरतो. पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून शेतामध्ये सर्व कामे करतो. आता शिवसेना संघटना अडचणीत असताना एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेना बांधणीसाठी मशागत करीत आहेत. दुसरीकडे आपण शेतामध्ये मशागत करीत आहोत. मात्र, लावणी झाल्यानंतर शिवसेनेमध्ये देखील मशागतीसाठी पुढाकार घेऊ. मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन व्यक्‍तींच्या भल्यासाठी ही संघटना आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे शेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर केले आहे.

त्यामुळे त्यावर कुणाचाही हक्‍क नाही. या शेताची मशागत करण्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक तयार आहेत. मात्र, पक्षप्रमुखांनी या शेतामध्ये कोणते पीक घ्यायचे? चांगले पीक येण्यासाठी कुठे काय करायचे? कुठे खताचा मारा करायचा? कुणाला कुठे मशागतीसाठी पाठवायचे? याचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. येत्या काळात शिवसेनेमध्ये देखील भरघोस पीक येईल यात शंका नाही आणि त्यासाठी मराठी माणूस तयार आहे, असे मार्मिक उद‍्गार देखील काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here