खेड; पुढारी वृत्तसेवा :  सुमारे एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना फोन करून अज्ञाताने धमकावले होते. दि. 4 जून रोजी रात्री 10.30 वाजता त्यांना हा इंटरनेटचा वापर करून फोन करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे एक महिन्याने दि. 5 रोजी पुन्हा खेडेकर यांना अज्ञात व्यक्‍तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार खेडमध्ये मनसेतर्फे जून महिन्यात महाआरती करण्यात आल्यानंतर मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अज्ञाताने फोनवरून धमकी दिली होती. त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अज्ञात इसमाने इंटरनेटच्या सहाय्याने हा कॉल केल्याचे निष्पन्‍न झाले होते. श्री. खेडेकर यांना समोरून बोलणार्‍याने महाआरती व मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या विधानावरून नाराजी व्यक्‍त केली. ‘मी तुझ्या घरी येतो, मग पळून जाऊ नको,’ असे म्हणत त्याने धमकावले होते, अशी तक्रार श्री. खेडेकर यांनी खेड पोलिस ठाण्यात केली होती.

या घटनेनंतर सुमारे एक महिन्याच्या अंतराने मंगळवारी दि. 5 रोजी वैभव खेडेकर यांना पुन्हा एकदा अज्ञाताने फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली आहे. या बाबत मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशा धमक्यांना भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया खेडेकर यांनी या प्रकारानंतर दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here