चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कापसाळ येथील बंद घर फोडून सुमारे 42 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरी करणारा संशयित आरोपी लोकेश रावसाहेब लोकरे तर सायकल चोरटा सुरेंद्र काशिनाथ जाधव (42) याला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे.

शंकर गणपतराव झोरे (वय 52, रा. कापसाळ) यांचे बंद घर दि. 1 एप्रिल 2022 रोजी चोरट्याने दाराची कडी तोडून लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेली 41 हजार 700 रुपये किमतीची एक तुटलेली सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास केली होती. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन आरोपी लोकेश रावसाहेब लोकरे (28, रा. खटाव रस्ता, पाटील मळा, लिंगनूर, ता. मिरज) यास अटक करुन चोरीस गेलेली सोन्याची बांगडी हस्तगत केली आहे.

तसेच डीबीजे महाविद्यालयासमोरील शिरीष पांडुरंग पालकर यांच्या मालकीची 13 जून रोजी 2 हजार किमतीची सायकल चोरीस गेली होती. याची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याबाबत तपासाअंती धामणवणे बौद्धवाडी येथील सुरेंद्र काशिनाथ जाधव (42) यास अटक करून चोरीस गेलेली सायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक माने, हवालदार सुकन्या आंबेरकर, वृषाल शेटकर, पोलिस नाईक पंकज पडेलकर, श्री. माणके, पोलिस कॉन्स्टेबल श्री. दराडे व प्रमोद कदम यांनी ही कामगिरी केली आहे.

खेड येथेही एकाला अटक
खेड येथे दि. 4 जुलै रोजी संतोष गंगाराम शेले (रा. शिवाजीनगर) यांच्या पडवीमध्ये ठेवलेली 1500 रूपये किंमतीची शिलाई मशिन अज्ञाताने चोरून नेली होती. यावेळी चोरट्याने सीसीटीव्हीची वायर तोडून ओळख पटू नये म्हणून तोंडाला कापड गुंडाळले होते. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेतला असता नागेश यल्लाप्पा सोनाळ (55, रा. शिवईनगर, खेड) याला 5 जुलै रोजी अटक केली आहे व त्याच्याकडून चोरीस गेलेली शिलाई मशिन हस्तगत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here