रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्ह्यातील सर्व बाबींची माहिती देणार्‍या व्हॉट्सअप चॅटबॉट प्रणालीचे उद्घाटन गुरुवारी प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव रत्नागिरी विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी एका बैठकीत अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापन याचा आढावा घेतला. यावेळी या प्रणालीचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दूरध्वनी क्रमांक न लागणे अथवा व्यस्त असणे यामुळे माहिती प्राप्त होणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत हा चॅटबॉट आपणास विविध प्रकारची माहिती आपल्या मोबाईलवर देणार आहे. या प्रणालीच्या मदतीने प्रत्येक नागरिकास केवळ पर्जन्यमान नव्हे तर नदी पाणी पातळी, वेधशाळेतर्फे जारी सूचना, जिल्ह्याबाबत जारी विशेष सूचना, आपत्कालीन स्थितीत संपर्क करावयाचे क्रमांक, रस्ते व वाहतूक, भरतीच्या वेळा, रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा तसेच वेळोवळी जारी महत्वाचे संदेश आपणास तात्काळ प्राप्त करता येतील. 7387492156 हा मोबाईल क्रमांक असून, यावर व्हॉटसपच्या माध्यमातून मेसेजचे पर्याय पाठविल्यास 1 ते 9 पर्यंत विविध माहितीची उपलब्धता असणार आहे.

या स्वरुपाचा राज्यात हा पहिलाच उपक्रम आहे. यात अधिक सचूकता आणि वेळोवेळी त्यात माहिती अपडेट करण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. या प्रणालीबाबत प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले व योग्य आणि विश्‍वासार्ह संदेश देण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत त्यांना कोविड आणि गणपतीपुळे विकास आराखडा यांचाही आढावा घेतला. गणपतीपुळे विकासआराखड्यातील कामे 31 डिसेंबर 2023 पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here