रत्नागिरी; जान्हवी पाटील : गतवर्षी चिपळूण, खेड या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांना नैसर्गिक आपत्तीत जीव गमवावा लागला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी ठोस असा पर्याय शोधताना आपत्तीग्रस्त भागांमध्ये थेट जनतेशी संवाद साधून त्यांना अलर्ट करता यावे, यासाठी टू वे सार्वजनिक उद्घोषणा ही संकल्पना पुढे आली आणि याची अंमलबजावणी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील आपत्तीप्रवण 406 गावांमध्ये सुरू झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अशी प्रणाली राबविणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

ही प्रणाली राबवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी मागील तीन महिन्यात तब्बल 20 ते 25 वेळा बैठका घेतल्या. इतकेच नव्हे तर प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे ही प्रणाली राबविणारा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात बसून जिल्ह्यातील थेट 406 गावांशी संवाद साधतात इतकेच नव्हे तर आपत्तीशी निगडित कोणतीही माहिती देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी त्या त्या गावांशी संपर्क काही साधून चर्चा आणि मार्गदर्शन करु शकतात. ही संकल्पना यशस्वी होईल की, नाही असे वाटत असतानाच या संकल्पनेमुळे पहिल्याच पावसातील अनर्थ टळला आहे. चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. यावेळी या प्रणालीव्दारे संबंधित गावांतील यंत्रणेशी संवाद साधून अलर्ट करण्यात आले होते. त्यामुळे नागरिक सावध झाले होते. पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतेही नुकसान होवू नये, यासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती.

टू वे म्हणजे दोन्ही बाजूनी उद्घोषणा करता येणार आहे. जर चिपळूणमध्ये काही झाल्यास स्थानिक स्तराचे अधिकारी, कर्मचारी या उद्घोषणेव्दारे प्रशासनाला याची माहिती त्वरित देवू शकतात. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष, पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हा परिषद या ती ठिकाणी हे युनिट कंट्रोल बसविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांच्या कर्मचार्‍यांना त्वरित आपत्तीविषयक माहिती मिळणार आहे.

विजेविना 20 दिवस चालू शकते प्रणाली

टू वे सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली हे विद्युुत खंडित झाले तरी 20 दिवसापर्यंत सुरु राहू शकते. त्यामुळे ही प्रणाली 24 तास सुरु ठेवली जाते. गतवर्षी पूरस्थितीमध्ये इंटरनेट सुविधांपासून सगळी यंत्रणा ठप्प झाली होती ही यंत्रणा मात्र विना खंडित राहणार आहे. त्यामुळे ही उद्घोषणा प्रणाली आपत्तीकाळात लोकांच्या सुरक्षेसाठी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here