कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : महादेवाचे-केरवडे कुसग्याची गाळू येथील शेतकरी विठ्ठल रामा कोळेकर (वय 51) हे निळेली येथील ओहोळाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वा.च्या सुमारास घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडली. तर सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथे 65 वर्षीय वृद्ध महिलेचा नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

विठ्ठल कोळेकर हे नेहमीप्रमाणे गुरे घेऊन निळेली दापटी येथे शनिवारी सकाळी 9.15 वा.च्या सुमारास निघाले. गेले चार दिवस सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे निळेली येथील ओहोळाला पूर आला होता. त्यामुळे ओहोळानजीकचा सपाट भागही पाण्याने भरला होता. बहुदा त्या पाण्याचा अंदाज विठ्ठल कोळेकर यांना आला नसावा आणि ते वाहून गेल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला. दुपारी 12 वा.च्या सुमारास त्या ठिकाणाहूनच असलेल्या पायवाटेने त्यांची मुलगी मार्गस्थ होत होती. तिला ओहोळाच्या पाण्यात कुणीतरी तरंगताना दिसले, म्हणून तीने जवळ जावुन तिने पाहीले असता ते तिचे वडीलच असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून मुलीने आरडाओरड केली.त्यानंतर शेजारील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.माणगांव पोलिसांना याबाबतची कल्पना देण्यात आली. माणगांव दूरक्षेत्राचे हे.कॉ.व्ही श्री. पालव, तलाठी श्री. राजूरकर, पोलिस पाटील सतीश केरवडेकर, माजी सरपंच पंढरी परब, नीलेश सावंत, गंगाराम सावंत यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर हा मृतदेह विच्छेदनासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.पण त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने मृतदेह कुडाळ येथे हलविण्यात आला. दरम्यान, त्यांचा मुलगा मुंबई येथून येत असल्याने अंत्यविधी रविवारी करण्यात येणार आहे. मृतदेह ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ-भावजय असा परिवार आहे.

शिरशिंगे नदीत वृद्ध महिला वाहून गेली

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिरशिंगे-धोंडवाडी येथील धोंड नामक 65 वर्षीय महिला नदीच्या पुरात वाहून गेली, ही महिला नदीपासून काही अंतरावर मृतावस्थेत आढळली, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. वृद्ध महिला शनिवारी सकाळी चारा कापण्यासाठी आपल्या शेतात गेली होती. नदीलगत चारा कापत असताना बहुतेक ती हात, पाय धुण्यासाठी नदीत उतरली असावी व पाय घसरून वाहून गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here