खेड; पुढारी वृत्तसेवा : आम्ही शिवसेना सोडलेली नाही व मरेपर्यंत सोडणारही नाही. आमच्याच पक्षाचे पालकमंत्री जेव्हा त्यांच्या पक्षाच्या आमदाराला कमी व शिवसेनेशी गद्दारी केलेल्या पराभूत राष्ट्रवादी आमदाराला जास्त निधी देतात, हे आम्हाला सहन झाले नाही. खेड न.प.मध्ये भ्रष्टाचार करणार्‍याला वाचवण्यासाठी प्रयत्न आमच्याच माणसांकडून केला जातो. केवळ माझे खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम आमच्याच लोकांनी सुरू केल्यामुळे आपल्याला शिंदे गटाबरोबर जाणे भाग पडले, अशा शब्दात आ. योगेश कदम यांनी आपल्या पक्षांतराबाबत केली. आमची नाराजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच नव्हती, असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आ. योगेश कदम यांचे दि. 9 रोजी खेडमध्ये हजारो कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले. खेड तालुका शिवसेनेतर्फे त्यांची कशेडी ते खेड मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेकडो वाहनांचा ताफा त्यांच्या सोबत होता. कशेडी बंगला येथून आ.कदमांच्या मिरवणुकीला सुरवात झाली. कशेडी ते भरणेंनाका या प्रवासात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले.ही मिरवणूक भरणे श्री देवी काळकाई मंदिर येथे आल्यानंतर आ.कदम यानी देवीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने आ.कदम यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. देवीच्या दर्शनानंतर भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आ.कदम यांनी अभिवादन केले.

भरणे नाका येथून शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ताफ्याने आ. कदम छ. शिवाजी महाराज चौक खेड येथे पोहोचले. तेथे शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे, महिला आघाडी पदाधिकारी व युवा सेनेच्या वतीने भव्य पुष्पहार घालून आ.कदम यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक पुढे वाणीपेठ,बाजारपेठ, गणपती मंदिर मार्गे तीनबत्ती नाका येथे पोहोचल्या नंतर आ.कदम यांनी उपस्थित जनसमुदायला संबोधित केले. यावेळी आ. कदम म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही व मरेपर्यंत सोडणार नाही. आमच्याच पक्षाचे पालकमंत्री जेव्हा त्यांच्या पक्षाच्या आमदाराला कमी व शिवसेनेशी गद्दारी केलेल्या पराभूत राष्ट्रवादी आमदाराला जास्त निधी देतात हे आम्हाला सहन झाले नाही. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी कधीच नव्हती. त्यांच्या बरोबर असलेल्या आमच्या नात्यात दरी निर्माण केली जात असताना शिवसेना संपवण्यासाठी विरोधकांना मदत केली जात होती, असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here