कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्गातील काम बहुतांश पूर्ण केल्याचा दावा ठेकेदार कंपनीकडून केला जात असला तरी अद्यापही अनेक सर्व्हीस रस्ते, गटारे तर काही ठिकाणी लेनची कामे अपूर्ण आहेत. शिवाय झालेल्या कामातही ठिकठिकाणी निकृष्टपणा उघड झाला आहे. कणकवलीतील उड्डाणपुलाच्या रस्त्याला तडे जात असतानाच याचवर्षी बांधलेल्या खारेपाटण शुकनदीवरील नवीन पुलाचा भराव खचला असून संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. कालच ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कणकवलीत उड्डाणपुलावरील बॅरीकेटस्ला आदळून दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सार्‍या प्रश्नांकडे ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण कानाडोळा करत असून टोल वसुलीसाठी मात्र त्यांचा आटापिटा सुरू आहे. ठेकेदार कंपनीच्या अनेक त्रुटींकडे आणि अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम महामार्ग प्राधिकरण करत आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वेळोवेळी आक्रमकपणे आंदोलने करणारे राजकीय नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र आता थंड असून ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणला जाब विचारणार का? असा सवाल जनतेतून केला जात आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीरकण कामाला गती मिळाली आणि बहुतांशी काम पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र अद्याप काही ठिकाणी सर्व्हीस रोड, गटारे आणि काही ठिकाणी लेनची कामे अर्धवट आहेत. अनेक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. नांदगावसारख्या भागात चुकीच्या पध्दतीने काम केल्याने पाण्याचा निचरा न होणे, शेतामध्ये पाणी घुसणे, लगतचे रस्ते पाण्याखाली जाणे असे प्रकार झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक पदाधिकार्‍यांनी उपोषणाची नोटीस दिली आहे.

कणकवली गडनदीनजीक वागदे येथील 500 मीटरच्या एका लेनचे काम अद्याप अपूर्ण आहे. संबंधित जमीन मालकांना मोबदला न मिळाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे एकाच लेनवरील वाहतुकीमुळे वेळोवेळी या ठिकाणी अपघात झाले आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हीस रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. कणकवली शहरात सर्व्हीस रस्त्यांवर आतापासूनच खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. लगतच्या गटारांची कामे निकृष्ट आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहताना दिसते. तर उड्डाणपुलाच्या खालच्या बाजुने प्लंबिंगचे काम अर्धवट ठेवल्याने उड्डाणपुलावरील पाण्याचे धबधबे सर्व्हीस रोडवरून जाणार्‍या पादचार्‍यांवर आणि वाहनांवर पडत आहेत. कणकवलीत उड्डाणपुलाच्या मंजुनाथ हॉटेल ते जानवली पुलापर्यंतच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे रस्त्याच्या पडलेल्या तड्यांवरून दिसत आहे. मुळात या जोडरस्त्याच्या बॉक्सेल भरावाचे कामच निकृष्ट झाले होते. हा भराव काढून त्या ठिकाणी वायबीम पिलर उभारून रस्ता तयार केला जाईल, असे आश्वासन महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले होते, परंतु त्याचीही पूर्तता अद्याप झालेली नाही. गतवर्षीपासून या उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याला तडे जात असून त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. यावर्षीही काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यावर मलमपट्टी करून त्या ठिकाणी बॅरीकेटस् ठेवण्यात आले आहेत. मात्र ते चुकीच्या पध्दतीने ठेवण्यात आल्याने गुरूवारी रात्री मोटरसायकल आदळून दोघांना आपला जीव गमवावा लागला. याला ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा कारणीभूत असून ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कणकवलीच्या नगराध्यक्षांनी केली आहे.

याचवर्षी खारेपाटण शुक नदीवर नवीन पूल बांधण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात पुलाचा भराव खचल्याने लगतच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे पुलावरून वाहतूक बंद असूनही भराव खचला आहे. शंभर वर्षाहून अधिक काळ वाहतुक सुरू असलेला ब्रिटीशकालीन पूल अद्यापही भक्कम आहे. मात्र याचवर्षी बांधलेल्या पुलाचा भराव खचल्याने कामातील निकृष्टपणा उघड झाला आहे.

झारापपासून खारेपाटणपर्यंत या महामार्गाला अजिबात लेव्हल नाही. अनेक ठिकाणी काही ना काही त्रुटी आहेतच. स्थानिक नागरीकांकडून त्या दूर करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही सारी परिस्थिती महामार्गाच्या कामाची असताना ओसरगाव टोल प्लाझा येथे टोल वसुली सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरण अ‍ॅथोरेटीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी कंत्राटदार कंपनीही नियुक्त करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत महामार्गाचे जिल्ह्यातील सर्व काम पूर्ण होत नाही आणि जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळत नाही तोपर्यंत टोल वसुली करण्यास राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. मात्र तरीही महामार्ग प्राधिकरणने टोलवसुली ठेकेदार कंपनीला कारवाईचा इशारा देत पोलिस बंदोबस्तात टोल वसुली सुरू करण्याचे पत्र दिले आहे. म्हणजे महामार्ग कामाच्या दर्जाबाबत आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे त्यांचे काहीच देणे-घेणे नाही. आता केवळ टोल वसुली हेच त्यांचे टार्गेट आहे. आपल्याच जिल्ह्यातून महामार्गावरून प्रवास करताना आपल्याच जिल्ह्यातील लोकांना टोल द्यावा लागणार आहे. मात्र जिल्हावासीयांना टोल माफी मिळालीच पाहिजे ही जनतेचीही मागणी आहे. टोलबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेवून तोडगा काढण्याबाबत प्रशासनाने ग्वाही दिली होती. मात्र ती बैठक झालेली नाही. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामावेळी आक्रमकपणे आंदोलने करणारे या विविध प्रश्नांबाबत आक्रमक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेनेने अलिकडेच टोल वसुली विरोधात आंदोलन केले होते. सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नावर एकत्र येत वज्रमूठ दाखवण्याची गरज आहे. अन्यथा पोलिस बळाचा वापर करून टोल वसुली सुरू झाल्यास नवल वाटणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here