रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आ. उदय सामंत यांच्या पाठिशी मतदारसंघातील कार्यकर्ता ठाम उभा आहे. साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा एकमताने पाठिंबा असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून समाजमाध्यमावर उमटत आहेत. आ. सामंत यांना महत्त्वाचे खाते मिळण्याचीही खात्री या तमाम समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करु लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेत बंड केल्यानंतर, माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हेही त्यांना जाऊन मिळाले. तत्पूर्वी त्यांनी रत्नागिरीतील शिवसेनेसह ज्येष्ठ आणि प्रतितयश लोकांशी चर्चाही केली. मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या लढ्याला आ. सामंत यांनीही साथ दिली. यानंतरही रत्नागिरीतील शिवसेना शांत आहे. आ. सामंत यांनी केलेले काम याशिवसेना पदाधिकार्‍यांनाही माहित आहे. कुणालाही न दुखावता सर्वांना सोबत घेत पक्ष वाढीसोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही त्यांनी उभा केला आहे.

आ. सामंत यांनी रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. राज्यात कोकणातील मुले माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत गेली दहा वर्षे अग्रेसर आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर न जाता जिल्ह्यातच त्यांनी शिक्षणाच्या उच्च संधी मिळाव्यात यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद असताना पुणेप्रमाणे रत्नागिरीही शैक्षणिक हब होण्यासाठी आ. सामंत प्रयत्नशील होते. त्यात त्यांना मोठ्याप्रमाणात यशही आले. पर्यटनदृष्ट्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. हे करताना स्थानिक नागरिक, युवा वर्गाला उभारी देण्याचा प्रयत्न केल्यानेच, आज पक्षातील स्थानिक नेतेमंडळी आपली पदे सांभाळत असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिक मात्र आ. सामंत यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.

आ. सामंत यांचे वडील अण्णा सामंत व बंधू किरण सामंत हेही समाजकारणासाठी शंभर टक्के योगदान देत असतात. मंत्रीपद असल्याने मतदारसंघात नागरिकांना काही समस्या असल्यास, त्यांनी त्यांचे बंधू व वडिलांसमोर त्या ठेवल्यास या समस्या सुटल्या नाहीत, असे कधी झाले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना या गोष्टी नेहमीच भावत आल्या आहेत. मंत्रीपद असतानाही त्यांनी मतदारसंघाकडील आपले लक्ष ढळू दिले नाही, शनिवार व रविवारी त्यांची मतदारसंघातील हजेरीच त्यांच्या कामाचा पुरावा देत असते. मतदारसंघाच्या भल्यासाठीच आ. सामंत यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आता ग्रामीण भागातही झडू लागली आहे. त्यामुळे युवा फळीबरोबरच ग्रामीण भागातही आ. सामंत यांना पाठिंबा वाढत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारीही कार्यकर्त्यांकडून सुरू करण्यात आली आहे.

सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आ. सामंत यांनी केला आहे. त्यामुळे अशा नेत्याची साथ आम्ही कधी सोडणार नाही. साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा सर्वांचा एकमताने पाठिंबा आहे. आमचा विश्वास काल, आज आणि उद्याही फक्त तुमच्यावरच असेल.
-तुषार साळवी, माजी युवा तालुकाधिकारी









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here