रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ‘मातोश्री’वर रश्मीताईंनी तुम्हाला जेवायला वाढले. आदित्य ठाकरेंनी मोठा भाऊ समजून तुमच्या खांद्यावर डोके ठेवले, हातात हात दिला. अगदी आपल्या घासातील अर्धा घास तुम्हाला दिला. उदय सामंत तुम्ही या अन्नाची किंमत ठेवली नाही. पक्षाने विविध पदे दिली; पण तुम्ही गद्दारी केली. अगदी म्हाडा अध्यक्ष व मंत्रिपदही दिले; पण रत्नागिरीच्या या मातीत नररत्नांऐवजी हे असे कसे जन्माला आले, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आ. उदय सामंत यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या आ. उदय सामंत यांच्या विरोधात रत्नागिरीत निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. राऊत यांनी आ. सामंत यांच्यावर तोफ डागली. आठ वर्षापूर्वी म्हणजे कालपरवा शिवसेनेत आलेले आ. सामंत म्हणतात की, सेनेला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. केवढी मोठी भीष्माचार्यांची प्रतिज्ञा केली. राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन हे शिवसेनेत आले, येताना खा. शरद पवारांच्या तोंडाला यांनी पाने पुसली. उध्दव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आपले केले. परंतु यांनी विश्वासघात केला. शिवसेनेने अशी किती बंडे पाहिली आहेत. त्यामुळे तुम्ही गेला तरी काही फरक फडणार नाही. सेनेचा धनुष्य हिसकावण्याचा प्रयत्न करणारी औलाद परत निवडून येणार नाही. उध्दव ठाकरे यांना जेव्हा आधाराची गरज होती. त्यावेळी पळपुटेपणा करुन ही मंडळी निघून गेली. यांच्यावर विश्वास ठेवला यात उध्दव ठाकरेंची काय चूक झाली, असा प्रश्नही खा. राऊत यांनी उपस्थित केला. गद्दारीची पार्श्वभूमी असलेल्यांचे भविष्य उज्वल नसल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सासुरवास कमी नव्हता. गेली दोन वर्ष मीही हे भोगत होतो. आ. सामंत आता तिकडे गेल्याने येथील नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच तणावमुक्त झाले असून रत्नागिरीहा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे दाखवून देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा असे सांगतानाच गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नसल्याचेही खा. राऊत यांनी शेवटी सांगितले. या मेळाव्याला आमदार व उपनेते राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रदीप बोरकर, उदय बने, राजू महाडिक व पदाधिकारी उपस्थित होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here